कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ग्राउंडवर 11 ते 22 डिसेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या सैन्य भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केल्या.

सैन्य भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना पिण्याचे पाणी, ये-जा करण्यासाठी के.एम.टी. बसेसची सोय, आरोग्य सुविधा, तात्पुरती स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सैन्य भरतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना चहा, नाश्ता, भोजनाची सोय करावी.

या ठिकाणी गर्दी होवू नये याचे नियोजन करावे. वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था राखावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने आवश्यक ते नियोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालक कर्नल आकाश मिश्रा यांनी दिली.