देवगड (प्रतिनिधी) : देवगड-नांदगाव मार्गावरील शिरगाव धोपटेवाडी कोणीचे वळणं येथे आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास खाजगी आराम बस आणि महिंद्रा बोलेरो टेम्पोमध्ये अपघात झाला. या अपघातात खाजगी आराम बसचे दर्शनी भागाची काच फुटून नुकसान झाले. मात्र, या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

घटनास्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव धोपटेवाडी नजीक असलेल्या कोणीचे वळण या ठिकाणी भाजी वाहतूक करणारा महेंद्र बोलेरो टेम्पोचा मागील टायर पंक्चर झाला होता. टेम्पोचे चाक काढून वळणावर तो उभा करून ठेवण्यात आला होता. त्यावेळी मुंबईहून येणाऱ्या खासगी आराम बसची पाठीमागून धडक या टेम्पोला जोरदार बसली.

त्यामुळे या आराम बसच्या दर्शनी भागाचे काच फुटून नुकसान झाले. धोपटेवाडी येथील या वळणावर रस्त्यावर काचा पडलेल्या दिसत होत्या. दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या आराम बसने पुढे मार्गस्थ करण्यात आले. मात्र, या अपघाताची नोंद उशिरापर्यंत देवगड पोलिसांत करण्यात आली नव्हती.