जम्मू ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले. त्यात बिहारच्या नवादा जिल्ह्यात राहणाऱ्या चंदन कुमारचाही समावेश आहे. त्यांच्या हौतात्म्याचे वृत्त समजताच कुटुंब व गावात शोककळा पसरली. शहीद पत्नी शिल्पी कुमारी यांची प्रकृती खालावली आहे. चंदन कुमार यांचे महिन्याभरापूर्वीच लग्न झाले आहे.

शहीद कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तो अतिशय गरीब कुटुंबातून आला होता. गावात असलेले त्यांचे घरही जीर्ण अवस्थेत आहे. कुटुंबीय आता त्यांच्या पार्थिवाची वाट पाहत आहेत. शहीद चंदन कुमार हे नवादा जिल्ह्यातील वारिसाली गंज पोलीस स्टेशन क्षेत्रातील कुत्री पंचायतीच्या नरोमुरार गावचे रहिवासी होते.

26 वर्षीय चंदन 2017 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाला होता. ते गेल्या अडीच वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते. चंदन कुमार यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. ते भारतीय लष्कराच्या 86 बटालियन इन्फंट्रीमध्ये रायफल मॅन म्हणून तैनात होते. शुक्रवारी त्यांच्या शहीद झाल्याची बातमी समजताच घरात एकच गोंधळ उडाला. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.