कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी गेल्या चार वर्षात मतदरसंघात केलेली ६६१ कोटीची विकासकामे वेबसाईटच्या माध्यमातून मतदारांसमोर मांडण्याचा उपक्रम हा नावीन्यपूर्ण, स्तुत्य आणि सर्व लोकप्रतिनिधीं साठी अनुकरणीय आहे. पारदर्शक कारभार व कामातून स्वतःची ओळख निर्माण करणारे युवा आमदार ऋतुराज पाटील यांची पुढील वाटचाल नक्कीच अतिशय उज्वल असेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.


कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या कारकिर्दीला मंगळवारी चार वर्षे पूर्ण झाली. विजयादशमीचे औचित्य साधून ,’चौफेर विकासाचे ऋतूपर्व’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विकासकामाची माहिती देणाऱ्या वेबसाईटचे उद्घाटन दसऱ्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, आ.पाटील यांच्या या उपक्रमाचे राज्यभरातील काँग्रेसच्या आमदारांनीही त्याचे अनुकरण करावे यासाठी प्रयत्न करू असे म्हटले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, आपण काय काम करतोय हे सातत्याने लोकांसमोर येणे आवश्यक आहे. यासाठी क्यूआर कोडचा वापर स्तुत्य आहे.आ.पाटील अतिशय प्रभावीपणे काम करत असून प्रत्येक दसऱ्याला आपल्या मतदारसंघात असे नवे पाऊल टाकावे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, आ. पाटील यांचा सातत्याने नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न असतो. कोल्हापूर सारख्या जागृत जिल्ह्यात काम करणे आव्हानात्मक आहे पण सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ.पाटील चांगले काम करत आहेत. आपल्या कामामुळे ऋतुराज पाटील यांची राज्यातील जनतेला ओळख होत आहे .पूर आणि कोरोनात या दोघांनी प्रभावी काम केले आहे. नम्र आणि काम करणारा तरुण आमदार अशी चांगली प्रतिमा तयार करण्यात आ.पाटील यशस्वी झाले आहेत.

भविष्यात त्यांचे नेतृत्व राज्यभर पोहोचेल. आ.सतेज पाटील यांनी हिंगोली येथे भारत जोडो यात्रेत कोल्हापूरचे १० हजार लोक सहभागी करून घेत कुस्ती मैदान, फेटे या माध्यमातून वेगळा ठसा उमटविला. आमदार सतेज पाटील म्हणाले, आ. ऋतुराज यांनी राज्यातील पहिला आगळावेगळा उपक्रम या वेबसाईटच्या माध्यमातून सुरू केला आहे.आपण नेमके काय काम हे आकडेवारीसह मतदारांना, जनतेला कळावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले.