नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इस्रायल-हमास युद्धाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. राहुल गांधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मिझोरम दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी निशाणा साधला आहे.


पुढे बोलताना गांधी म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारापेक्षा इस्रायल-हमास युद्धात जास्त रस आहे. मात्र ‘माझ्यासाठी ही बाब आश्चर्यकारक आहे की, पंतप्रधान आणि हिंदुस्थान सरकारला इस्रायलमध्ये काय घडत आहे याबद्दल खूप रस आहे, परंतु मणिपूरमध्ये काय घडत आहे याबद्दल त्यांना अजिबात रस नाही.


राहुल गांधी यांनी जूनमधील आपल्या मणिपूर भेटीचा उल्लेख केला आणि त्यांनी जे पाहिलं त्यावर विश्वास बसत नसल्याचं सांगितलं. ‘मणिपूरची कल्पना भाजपनं नष्ट केली आहे. ते आता एक राज्य राहिलेले नाही, ती आता दोन राज्ये झाली आहेत’, असं देखील गांधी म्हणाले. मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा संदर्भ देत हा आरोप केला आहे. त्यामुळे भाजप यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.