मुंबई (प्रतिनिधी) :  दुधाला कायमस्वरुपी चांगला दर मिळावा यासाठी राज्य सरकार दुधाला किमान आधारभूत किंमत देणारा (एफआरपी) कायदा करणार आहे. हा कायदा खाजगी आणि सहकारी दूध संघांना लागू राहील. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दुधाच्या दराबाबत आज (शुक्रवार) बैठक पार पडली. दुधाला एफआरपी देणारा कायदा तातडीने केला जाईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. 

या बैठकीला दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, खासगी आणि सहकारी दुध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सध्या लॉकडाऊनच्या काळात दुध संघांनी दुधाचे भाव पाडले आहेत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहे. दुधाचा दर वाढवून मिळावा यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. दुधाच्या दराबाबत वारंवार शेतकऱ्यांकडून येणारी तक्रार लक्षात घेऊन हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवला जाणार आहे.