नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  कृषी कायदे मागे घ्यावेत तसेच इतर मागण्यांसाठी दिल्लीसह सिंघू सीमेवर गेल्या ३८० दिवसांपासून संयुक्त किसान मोर्चाचं आंदोलन सुरू होते. केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही हे आंदोलन सुरूच होतं. हे आंदोलन आता स्थगित केल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने पत्रकार परिषदेत केली आहे.

या आंदोलनामध्ये शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदा करावा, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात यावी. अशा मागण्या आंदोलकांनी केल्या होत्या.  त्यानंतर सरकारसोबत चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीनं पाच सदस्यीय समितीही नेमण्यात आली होती. त्यानंतर अखेर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.

एक वर्षाहून अधिक काळ चाललेलं शेतकरी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. यानंतर ११ डिसेंबरपर्यंत सिंघू बॉर्डरवरुन शेतकरी आपला मुक्काम हलवणार आहेत.