मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. तर उमेदवारी जाहीर होताच उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देत आपण राजकारण करणार नसल्याचे म्हंटले आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. राजकारण हे माझ्यासाठी नवीन क्षेत्र मला आहे. परंतु माझा प्रमाणिक प्रयत्न जे कोणी देशद्रोही करतील त्यांच्या विरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी, सामान्य गरीब माणसाला न्याय कसा मिळेल, हे पाहणे असेल. परंतु मी राजकारण नवीन असलो तरी राजकारण कुठेही करणार नाही. समाजकारण करत सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार, असे उज्ज्व निकम यांनी स्पष्ट केले.

उज्ज्वल निकम म्हणाले की, वर्षा गायकवाड या माझ्याविरोधातील उमेदवार आहेत आणि त्यांना मोठा राजकीय अनुभव आहे, याची मला कल्पना आहे. पण माझा जन्म हा हनुमान जयंतीला झाला आहे. मी आतापर्यंत मुंबईत अनेक महत्त्वाचे खटले चालवले आहेत. त्यात देशाची सुरक्षा, देशाचं सार्वभौमत्व आणि त्याचप्रमाणं संघटित गुन्हेगारीपासून या मुंबापुरीला वाचवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे कुठलंही आव्हान स्विकारण्याची माझी तयारी आहे. जळगावच्या कडक उन्हात मी वाढलो आहे. त्यामुळे राजकारण करणार नाही याची मी ग्वाही देतो, असा पुनरुच्चार उज्जव निकम यांनी केला.