बेळगाव ( प्रतिनिधी ) बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आपली उमेदवारी नक्की झाली असून आपल्याला काम करायला लावले आहेत, असे सांगत कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि मूळचे धारवाडचे असलेले जगदीश शेट्टर यांनी सोशल मीडियावर आपला प्रचार सुरू केला आहे. अनेक टीव्ही माध्यमांनाही त्यांनी या संदर्भातील माहिती दिल्यानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पर्यायाने बेळगाव जिल्ह्यातील अनेक जण नाराज झाले आहेत.

भाजपकडे स्थानिक उमेदवार नाही का अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या गो बॅक शेट्टरचा ट्रेंड सुरू झाला असून आम्हाला आमचा उमेदवार द्या असे सांगणारे ट्विट्स केले जात आहेत. जगदीश शेट्टर हे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ते काँग्रेसला गेले होते.

त्यानंतर त्यांना भाजपमध्ये पुन्हा घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी हावेरी मतदारसंघांमध्ये आपल्याला उमेदवारी द्यायची मागणी केली होती. मात्र सध्या तेथे माजी मुख्यमंत्री बसवराज बॉम्माई यांना उमेदवारी देण्यात आली आणि शेट्टर यांना बेळगाव येथे उमेदवारी दिली जाणार असे बोलले जात आहे.

या दरम्यान सध्या तरी कोणती स्पष्टता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेली नसली तरी जगदीश शेट्टर यांना मात्र प्रमाणाबाहेर विरोध होऊ लागला आहे. बेळगाव जिल्ह्यात उमेदवारी दिल्यास जगदीश शेट्टर पडू शकतात. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये अशी मागणी खुद्द भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी केली होती. आता स्वयंस्फुर्तीने नागरिक ट्विट करून अशा पद्धतीची मोहीम राबवत असून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा, जे पी नड्डा आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून अशा पद्धतीच्या ट्विट्स होऊ लागल्याने आता शेट्टर यांना उमेदवारी दिली तर त्याचा काय परिणाम होईल याचे चित्र दिसून येत आहे.