कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : देशाच्या प्रगतीसाठी प्रा. संजय मंडलिक यांना साथ द्या, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बाजार समितीमध्ये “मिसळपे चर्चा…..” या कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.

महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बाजार समितीमध्ये आयोजित “मिसळपे चर्चा…” या कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आदी प्रमुखांनी व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार, कामगार व मजूर यांच्याशी संवाद साधला.

भाषणात मुश्रीफ पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसनशील भारत ही ओळख पुसून विकसित भारत हा नवा लौकिक निर्माण केला आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचे आणि भारतवासीयांना कल्याणकारी योजना देण्याचे मोठे कार्य केले आहे. म्हणूनच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत ही सबंध भारतवासीयांची भावना आहे.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचंड मताधिक्यांच्या विजयासाठी महायुतीतील सर्वच नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी महायुतीमधील सर्वच घटक समन्वयाने नियोजनबद्ध कामाला लागले आहेत.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याची शपथ घेऊया.

बाजार समितीच्या समस्या……..!

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, बाजार समितीच्या कोणत्याही अडीअडचणी असू देत. त्यासाठी मी सदैव तत्पर आहे. फक्त एक आवाज द्या, कोणतीही तुमची कोणतीही समस्या सोडूवू, असे ते म्हणाले. स्वागत बाजार समितीचे संचालक नंदकुमार वळंजू यांनी केले. प्रास्ताविक संचालक सूर्यकांत पाटील यांनी केले.

यावेळी नामदार हसन मुश्रीफ, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, प्रा. जयंत पाटील, यशोवर्धन मंडलिक, सुजित चव्हाण, महेंद्र चव्हाण, बाजार समितीचे उपसभापती शंकर पाटील, सत्यजित उर्फ नाना कदम, असिफ फरास, शिवाजी जाधव, बाळासाहेब पाटील, आप्पा लाड, संजीव परीख, निलेश पटेल, जमीर बागवान, नईम बागवान, अशोक अहुजा आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.