कोल्हापूर (प्रतिनिधी) : तक्रारदाराचे गुंठेवारी प्रकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी २५ हजारांची लाचेची मागणी करून प्रत्यक्षात २० हजारांची लाच स्वीकारताना आज (मंगळवार) इचलकरंजी नगरपालिकेतील अभियंता पंटरसह लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला.

बबन कृष्णा खोत (वय ५७, पद – शाखा अभियंता नगररचना विभाग, रा. नारायण मळा, इचलकरंजी), व खासगी इसम किरणकुमार विलास कोकाटे (वय ४६, रा. संत मळा, इचलकरंजी) असे कारवाई झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

इचलकरंजीमधील तक्रारदार यांच्या जमिनीच्या गुंठेवारी पोट विभागणीची फाईल इचलकरंजी नगरपरिषदेत प्रलंबित होती. त्या फाईलवर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  यांची सही घेऊन काम पूर्ण करून देण्यासाठी अभियंता खोत यांनी प्रथम २५ हजारांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. तर तडजोडी अंती २० हजार रुपये ठरले. त्यामुळे तक्राराने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार आज पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत अभियंता खोत व  पंटर कोकाटे यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक विकास माने, सुनिल घोसाळकर, पोलीस कॉन्स्टेबल मयुर देसाई, रुपेश माने यांनी केली.