राधानगरी ( प्रतिनिधी ) दाजीपूर अभयारण्य परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ओलवन दाजीपुरसाठी प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. मात्र या आरोग्य केंद्रात डॉक्टरसह परिचारिका आणि इतर स्टाफ उपलब्ध नसल्याने दुर्गम भागातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रास डॉक्टर आणि इतर स्टाफ देण्याची मागणी ओलवन दाजीपुरसह पश्चिम भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.


सविस्तर वृत्त असे की, वनग्रस्त आणि राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी ओलवन दाजीपूर इथं कोठ्यावधी रुपयांची प्रशस्त इमारत बांधली आहे.या इमारतीचा उदघाटन शुभारंभ तत्कालीन आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावक आमदार प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला होता.

परंतु आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि इतर पुरेसा स्टाफ उपलब्ध न केल्याने पुरेशा आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. या आरोग्य केंद्राला डॉक्टर आणि इतर स्टाफ उपलब्ध करुन देण्याची मागणी पश्चिम भाग परिसरातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.


यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांच्यासमोर नागरिकांनी व्यथा मांडली. या परिसरातून निपाणी देवगड राज्यमार्ग गेलेला आहे. वन परिसर आणि घाट रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचार देखील इथं मिळत नाहीत. त्यामुळे अनेकदा अपघातानंतर अपघातग्रस्त दगावण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

त्याचबरोबर येथील नागरिकांनाही आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत या परिसरातील नागरिक शेती मोलमजुरी आणि उदरनिर्वासाठी इतर कामे करतात मुख्यतः या भागांमध्ये महिलांची प्रस्तुती, जंगलातून फिरत असताना सर्पदोष झाल्यास तात्काळ उपचार मिळणं गरजेचं आहे.


त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र ओलवन दाजीपूर या आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असणारे डॉक्टर परिचारिका आणि इतर स्टाफच्या जागा भरून पुरेशा आरोग्य सुविधा देण्याची मागणी निवेदनाद्वारे पश्चिम भाग परिसरातील ग्रामस्थांनी केलीय. राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी लक्ष्मण सावंत,प्रवीण कोरगावकर, पंढरी पाटील ,चेतन कोरगावकर, प्रवीण पाटील, प्रकाश पाटील, उत्तम पाटील, दीपक तेली, रवी पाटील, विलास राणे संजय कदम, किरण कदम आदी उपस्थित होते.