पुणे ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कोथरूड मदारसंघातील नागरिकांसाठी मोफत सेवा पुरविण्यावर भर देतात. सध्या त्यांनी आपल्या मतदारसंघात कन्यादान उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा अनेक जण लाभ घेत आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, लग्न म्हणजे वधू आणि वर यांच्या एकत्रित आयुष्याची नवीन सुरुवात, कुटुंबात असणारी लगबग, खरेदी आणि बरंच काही. या समारंभाच्या निमित्ताने आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबामध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि मुलीच्या घरच्यांना तिची सन्मानाने पाठवणी करता, यावी यासाठी कोथरुड मतदारसंघात कन्यादान उपक्रम राबविला आहे.

उपक्रमाच्या माध्यमातून कोथरुड मधील लेकींच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिबिंब उमटताना पाहून एक वेगळीच ऊर्जा मिळते, असे पाटील यांनी म्हटले आहे.या उपक्रमामुळे लग्नाच्या खर्चात हातभार लागल्याने अनेक कुटुंब समाधान व्यक्त करत आहेत.

कोथरुड मधील कर्वेनगर भागातील प्रियंका फासाटे ही आमची लेक लवकरच वैवाहिक जीवनास सुरुवात करत आहे. त्यामुळे तिला तिच्या वैवाहिक जीवनात कशाचीही कमतरता भासू नये, म्हणून संसारोपयोगी वस्तू आणि साडी देऊन पाटील यांनी तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी तिच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान लाभत असल्याचे पाटील यांनी सांगितले.