कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आणि हुतात्मा बाबू गेणू यांच्या स्मृतिदिनानिमित्त रघुनाथदादा शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक निर्मला सांस्कृतिक भवन येथे ११ व १२ डिसेंबररोजी होणार आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज (बुधवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी कायदे, पीक विमा कंपन्याचा भोंगळ कारभार, शेतकरी आत्महत्या, शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका, उसाची एफआरपी यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन ठराव केले जाणार आहेत. तसेच विविध विषयांवर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन, व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान १२ डिसेंबरला सायंकाळी इस्लामपूरमध्ये ४ वाजता भव्य मिरवणूक होणार असून त्यानंतर जाहीर सभा ही होणार असल्याचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अॅड. माणिक शिंदे, बाळ नाईक, अॅड. अजित पाटील, प्रतिक कुलकर्णी, शंकर बावडेकर, डी. के. कोपार्डेकर, गुणाजी शेलार, राजलक्ष्मी कुलकर्णी आदी उपस्थित होते.