नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सीआरपीएफ देशसेवा करणाऱ्या एका जवानाने दिग्गज नेत्याला धूळ चारल्याची चर्चा आता संपुर्ण छत्तीसगढमध्ये सुरु आहे. सीआरपीएफ मधून राम कुमार टोप्पो यांनी स्वैच्छिक निवृत्ती घेतली. आणि सीतापूर विधानसभा मतदारसंघातून भूपेश बघेल सरकारचे मंत्री यांचा 17 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

या वर्षाच्या सुरुवातीला, सीआरपीएफमध्ये सेवा देत असलेल्या टोप्पोला छत्तीसगडमधील जगदलपूर येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले. सीआरपीएफने पहिल्यांदाच छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून राज्यात नक्षल समस्या आता नियंत्रणात असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात नक्षलविरोधी कारवायांमध्ये केंद्रीय दल तैनात करण्यात आले आहे.

टोप्पो यांनी काँग्रेस नेते भगत यांचा 17160 मतांनी पराभव केला. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःची ओळख माजी सैनिक राम कुमार टोप्पो अशी केली आहे. टोप्पो यांना 83088 मते मिळाली. छत्तीसगड सरकारमधील पर्यटन, संस्कृती, अन्न आणि ग्राहक मंत्री भगत यांना 65928 मते मिळाली. टोप्पो यांनी नागालँड, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, केरळ आणि दिल्ली येथे सेवा दिली आहे. 2018-21 मध्ये त्यांनी श्रीनगरमधील सीआरपीएफ कमांडो युनिटमध्येही काम केले.

आपल्या विजयाच्या कारणांबद्दल बोलताना टोप्पो म्हणतात की लोक जमीन आणि वाळू माफियांना कंटाळले होते. टोप्पो म्हणतात, ‘येथे महिला सक्षमीकरण नाही. मी 13 वर्षे गणवेशात देशाची सेवा केली. आता मला नव्या भूमिकेत माझ्या लोकांची सेवा करायची आहे.