रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी येथे तुटलेल्या विद्युत वाहिनीतून विजेचा धक्का लागून म्हैशीची जागीच मृत्यू झाला. तर एकाला वीजेचा जोराचा धक्का लागला. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली. या घटनेमुळे महावितरणच्या भोंगळ कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी ज्ञानदेव कुंभार आपली जनावरे चारण्यासाठी नदीकडे घेऊन गेले  होते. त्यावेळी त्यांच्या म्हैशीच्या पायाला तुटलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागून म्हैशीचा जागेवरच मृत्यू झाला. तर कुंभार यांनाही विजेचा धक्का बसल्याने ते बाजूला फेकले गेले. त्यांच्या हातात काठी असल्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून ते वाचले.

दरम्यान, महावितरणच्या विद्युत अभियंता  सौ. सनगर  यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या घटनेबाबत  त्यांना विचारणा केली असता त्यांनी सदर डीपीवरील वीजपुरवठा बंद केला होता.  परंतु वीजपुरवठा  कसा चालू झाला, याची  सविस्तर चौकशी केली जाईल, असे सांगितले.

दरम्यान, जुलै महिन्यामध्ये आलेल्या महापुरामुळे नदीकाठचे अनेक विद्युत खांब पडून तारा तुटून पडल्या आहेत. अद्याप या  तारा जोडलेल्या नाहीत. तरीही या तारामध्ये विद्युत प्रवाह कुठून आला ? व कोणी चालू केला ? याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.