कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे मुंबईतील अमली पदार्थ विरोधी पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी फार्महाऊसवर असणाऱ्या मुद्देमालासह केअरटेकर निखील लोहारला ताब्यात घेतले. तर यातील मुंबई येथे स्थायिक असणारा मुख्य आरोपी वकील हा ढोलगरवाडीचाच असून तो सध्या फरार आहे. या कारवाईत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती डीसीपी दत्ता नलवडे यांनी मुंबईमध्ये दिली.

चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथील एका फार्महाऊसवर मुंबईतील अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी छापा टाकला. यामुळे तालुक्यात आणि जिल्ह्यात एक खळबळ उडाली. घोडे, म्हैशी आणि कोंबड्यांचे पालन करणाऱ्या फार्महाऊसमध्ये एमडी सारखा अमली पदार्थ सापडल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या फार्महाऊसवरील केअरटेकर निखील लोहारसह सहा जणांना ताब्यात घेवून त्यांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू होती. या चौकशीतून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोपी राजकुमार राजहंस हा पेशाने वकीली करत असून मुंबईवरून ढोलगरवाडीच्या फार्महाऊसवर सतत जात येत असे. तो मुंबईवरून नवीन ड्रग्स बनवण्यासाठी मटेरियल घेवून फार्महाऊसवर जायचा आणि तेथे तयार झालेले एमडी ड्रग्स घेऊन परत मुंबईला स्वतःच्याच गाडीतून जात होता. या फार्महाऊसचा केअरटेकर लोहार या सर्व प्रक्रियेत सहभागी होता. शिवाय मुंबईला जे एमडी सप्लाय केले जात होते. त्यातसुद्धा त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात मुख्य आरोपी आणि त्या फार्महाऊसचा केअरटेकर या दोघांचाच सहभाग आढळून आला आहे. यामधील मुख्य आरोपी राजकुमार राजहंस हा मूळचा ढोलगरवाडी गावाचा असून तो मुंबईत वकिली करतो. मुंबईत अटक करण्यात आलेली महिला एक पेडलर असून याच महिलेच वकीलपत्र मुख्य आरोपी असणाऱ्या वकील राजहंस याने घेतले होते. मात्र नंतर त्यानेच ड्रग्सचा धंदा सुरू केला होता.

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने एका महिलेला ५० ग्रॅम एमडी ड्रग्जसहित अटक केली होती. हे ड्रग्ज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी गावातून आल्याचे स्पष्ट झाले होते. तपासासाठी वांद्रे युनिट आणि घाटकोपर युनिटच्या तीन टीम ढोलगरवाडी गावात पाठवून तेथील फार्महाऊसची झाडाझडती घेण्यात आली. या झाडाझडतीमध्ये ३८ किलोंचे ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. रॉ-मटेरियलसुद्धा हस्तगत करण्यात आले आहे. याची एकुण रक्कम २ कोटी ३५ लाख इतकी होत असून मुख्य आरोपीचा शोध सुरु असल्याचे डिसीपी दत्ता यांनी सांगितले.