राशिवडे (प्रतिनिधी) : साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांकडून ऊस नोंदीचे करार सुरू आहेत. हे करार करताना कारखान्यांकडून ऊस दराबाबत करारही लिहून घेण्यात येतो आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याविषयी तक्रार करुन आंदोलन केले होते. यानंतर प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सर्व कारखान्यांना असे आदेश दिले आहेत की, शेतकऱ्यांची इच्छा असेल तर त्याच्याकडून ऊस दराबाबत असा करार नोंद करून घेण्यात यावा. अन्यथा जबरदस्ती केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

असे असून सुद्धा भोगावती सहकारी साखर कारखान्याकडून हा आदेश धाब्यावर बसवत ऊस नोंदीला येणाऱ्या शेतकऱ्यांकडून सरसकट ऊसदराबाबत करारही करून घेण्यात येत होता. हे निदर्शनास आल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भोगावती येथील गट ऑफिसमधील अधिकाऱ्यांना याविषयी जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रादेशिक सहसंचालकांचा आदेश दाखवूनही योग्य उत्तरे न दिल्यामुळे येथील गट ऑफिसमध्ये करण्यात आलेले ४०० ऊसदराबाबतचे करार स्वाभिमानीच्या वतीने फाडून टाकण्यात आले. इथून पुढे अशी जबरदस्ती झाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.

यावेळी साताप्पा पाटील, रंगराव पाटील, मानाजी पाटील, दशरथ पाटील, एकनाथ पाटील, तुकाराम सुतार, मधुकर पाटील, चंद्रकांत नेमाने, रावसो डोंगळे, कार्यकर्ते उपस्थित होते.