श्रीवर्धन : कामे संपत नसतात एक पूर्ण झाले की दुसरे सुरू होत असते पण एक काम संपल्यावर कुणाकडे मागितले जाते जो करेल त्याच्याकडे मागितले जाते. ज्याचा कामाशी सुतराम संबंध येत नाही. ज्याचा विचारांशी कधी संबंध येत नाही… त्या माणसाकडून अपेक्षा जनतेने करायच्या नसतात. काही वेळा काम केल्यानंतर अपेक्षा वाढतात याचा अर्थ माझ्या कार्यप्रणालीवर तुमचा विश्वास आहे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी श्रीवर्धनकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते शुक्रवारी संध्याकाळी श्रीवर्धन शहरात आयोजित सभेत बोलत होते.

२००९ पासून तुम्ही मला या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. श्रीवर्धन – म्हसळयाचा विकास हाच आमचा ध्यास. श्रीवर्धन-म्हसळयाचा विकास हाच आमचा श्वास. श्वास जिवंत तर आपण जिवंत. श्वास बंद तेव्हा जीवन बंद होते. गेल्या पंधरा वर्षांत या शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्यादृष्टीने पावले उचलली. हा ‘ट्रेलर आहे अजून पिक्चर अभी बाकी है’ असे सांगत सुनिल तटकरे यांनी विकास कामांचा धडाका अजून वाढणार असल्याचे सुतोवाच केले.

श्रीवर्धन या नावातच ‘श्री’ पण आहे आणि ‘वर्धन’ पण आहे ‘वर्धन’ याचा अर्थ ‘वृध्दी’ आणि ‘श्री’ म्हणून आपल्या शुभ कामाची सुरुवात करतो. ज्या गावाच्या नावातच श्रीवर्धन आहे त्या गावाची सेवा करण्याची संधी मिळणे हे भाग्यात लागते. ही तुमची सेवा करण्याचे माझ्या कपाळी आहे, असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

हाताची बोटे सारखी नसतात तरीसुद्धा दिर्घकाळ नेतृत्व करण्याची संधी मिळत असते तेव्हा त्या संधीचे सोने करण्याची इच्छाशक्ती लागते. जे – जे समाजाला अभिप्रेत आहे. उद्याचे २५ वर्षाचे भवितव्य डोळयासमोर ठेवत भारत सरकारच्या ज्या ज्या योजना असतील त्या आणण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलेन असा विश्वास सुनिल तटकरे यांनी नागरिकांना दिला.

निसर्गाने या भूमीला वरदान दिले आहे. कौलारू घरे. नारळी सुपारीच्या, आंब्याच्या बाग. या गुणवैशिष्ट्यासह असलेल्या या भूमीमध्ये त्याचपध्दतीने विकासाची कामे करावीत. रोजगाराची साधने उभी करावीत हा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून करत आलो आहे. टप्प्याटप्प्याने रुप बदलत गेले. शहर बदलत गेले. समुद्र किनार्‍याची नजाकत अधिक वाढत गेली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक यायला लागले. अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

कामे करायची तर मनापासून करायची. कोण काय वागलं यापेक्षा आज आणि उद्याचा उष:काल, उद्याचे स्वप्न नेमके काय? या गोष्टीकडे भर देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काम निर्माण करता येते. ४० वर्षाची सेवा, सत्ता येत – जाईल निवडणूक येतील – जातील जय – पराजय होत जातील. त्याहीपेक्षा समाजजीवनात ज्या कारणासाठी एकत्र आलो आहोत त्यावेळी लोकप्रतिनिधींकडून लोकांच्या तो उपलब्ध असला पाहिजे या अपेक्षा असतात. भविष्यात काय करणार याचा त्याच्याकडे रोडमॅप तयार असला पाहिजे असेही सुनिल तटकरे म्हणाले.