मुंबई : राजकीय पक्ष लोकसभा 2024 च्या निवडणुकीतून आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. तर महाराष्ट्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर भाजपचे जास्त आमदार असूनही त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. यात आगामी निवडणुकीतही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच असतील, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. महायुतीतील घटक पक्षाचे नेते राज्यातील मतदारसंघ पिंजून काढत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी देखील प्रचाराला सुरूवात केली आहे.

आज शनिवारी, तानाजी सावंत धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी सावंत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं सावंत सावंत म्हणाले.

आगामी काळातही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार, असंही सावंत म्हणाले. २०२४ आणि २०२९ पर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडेच महाराष्ट्राचं नेतृत्व असणार, असा मोठा दावाही तानाजी सावंत यांनी माध्यमांसोबत बोलताना केला. त्यांच्या या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.