मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. कांदा निर्यातीवर गेल्या काही काळापासून बंदी होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. दरम्यान, केंद्र सरकारने अखेर शुक्रवारी (३ मे) कांदा निर्यातीवरील बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यातीवर आता ४० टक्के शुल्क लावून निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे.

तसेच ३१ मार्च २०२५ पर्यंत देशी चण्याच्या आयातीवरील शुल्कात सूट दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांदा निर्याबंदी मुळे शेतकरी नाराज होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. केंद्र सरकारने मागील वर्षी राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड आणि मिझोरम राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यात बंदी केली होती. त्यानंतर ही बंदी मार्च 2024 पर्यंत वाढवली होती. त्यानंतर पुन्हा ही बंदी वाढवली. देशातील बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले होते. मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 महिने 27 दिवसानंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यात आली आहे. आता 40 टक्के ड्युटी व 550 डॉलर प्रति मेट्रिक टन शुल्क देत विदेशात व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे.

केंद्र सरकारने आठ दिवसांपूर्वी 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली होती. तसेच गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली होती. परंतु कांद्याची ही निर्यात फक्त बांगलादेश, श्रीलंका, भुतान, बहरैन, युएई आणि मॉरिशस या सहा देशांपुरती होती. परंतु आता सरसकट बंदी मागे घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, कांदावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर कांद्याच्या भावात 500 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याच्या बाजार भावात वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, कांदा निर्यात बंदी उठवली असली तरी, निर्यात बंदी असलेल्या काळात झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

फडणविसांची पहिली प्रतिक्रिया
शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यामुळे निर्यातबंदी उचलली पाहिजे, अशी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती. आमच्या या विनंतीला केंद्राने चांगला प्रतिसाद दिल्याने मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यातबंदी हटवण्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच, ‘विरोधकांनी नेहमीच राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे आणि सर्वसामन्यांचे हीत पाहतं’, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. निर्यात बंदी उठवल्यापासून मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत आहेत. त्याचा निश्चितच फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल. तसेच, कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याबद्दल केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.