मुंबई : शरद पवार या वयात स्वतः चे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते पक्ष काय सांभाळणार, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीतून केली होती. या टीकेला शरद पवार यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक असून मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं, असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार यांनी आज शनिवारी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मोदींची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पण त्यांनी असं व्यक्तिगत बोलू नये, असं पवारांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौटुंबिक टीकेला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, आपल्याला त्यांच्या बद्दल माहितीय, त्यांनी कुठे कुटुंब सांभाळलंय. त्या पातळीला मी जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली, तर ती अतिशय चिंताजनक आहे. पण, असं आपण व्यक्तिगत बोलू नये. ते कर्तव्य त्यांनी पाळलं नाही, पण आपण ते कर्तव्य न पाळण्याची भूमिका घेऊ नये, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

व्यक्तिगत टीका करण्याचं पथ्य पंतप्रधानांनी पाळले नाही. पण मीही हे पथ्य पाळू नये, ही भूमिका काही योग्य होणार नाही, असे भाष्य शरद पवार यांनी केले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत लोकांची उपस्थिती आणि त्यांचा प्रतिसाद पाहिला तर परिस्थिती वेगाने बदलत असल्याचं दिसून येतंय, असंही पवार म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर मदत घ्यायची वेळ येऊ नये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं की, बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून मला उद्धव ठाकरेंचा आदर आहे, त्यांना भविष्यात अडचण आली, तर त्यांच्.या मदतीला धावणार मी पहिला असेन. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर टीका करताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की, त्यांनी लाख म्हटलं असेल, पण आमची प्रार्थना ही आहे की, उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घ्यायची वेळ येऊ नये.