पंढरपूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे दोन आषाढी एकादशी व एक कार्तिकी एकादशी सोहळा साधेपणाने झाला होता. पण कोरोना  परिस्थिती  नियंत्रण येऊ लागल्याने  निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.  या  पार्श्वभूमीवर  यंदा पूर्वीप्रमाणे कार्तिकी एकादशीचा सोहळा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे.  

कार्तिक यात्रा पूर्व नियोजनाबाबत जिल्हा नियोजन भवन येथे आज (बुधवार) बैठकीचे आयोजन केले होते.  यावेळी ते बोलत होते. बैठकी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव,  उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आदी  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले की, यंदा कार्तिकी एकादशी  सोहळ्यासाठी कोणतेही निर्बंध ठेवण्यात येणार नाहीत. भाविकांनी कोरोनाचे नियम पाळावेत,  मास्क वापरावेत. तसेच  एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. याबाबत  आज (बुधवार)  जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मंदिर समितीच्या सदस्यांनी विठ्ठल मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे खुले करावे, कार्तिकी यात्रेत कोणतेही निर्बंध न ठेवता यात्रा पूर्वीप्रमाणे व्हावी, अशी मागणी केली होती.