मुंबई : राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यभरात प्रचार सभांचा, रॅलींचा धडाका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले भूषणसिंह होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता. तर आता अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अक्षय शिंदे हे रोहित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे रोहित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, आमदार रोहित पवार हे सध्या लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारार्थ रोहित पवार सभा घेत आहेत. अशातच आता रोहित पवार यांना कर्जत जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. रोहित पवारांचे कट्टर समर्थक अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

अक्षय शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहेत. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत अक्षय शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे. अक्षय शिंदे हे सुरुवातीपासूनच रोहित पवार यांच्यासोबत सक्रिय राजकारणात कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि अक्षय शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येत होते. आता त्यांनी अजित पवारांच्या पक्षाची वाट निवडली आहे.