कागल (प्रतिनिधी)  : कागल येथे राजमाता जिजाऊ महिला समिती व राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या झिम्मा -फुगडी स्पर्धेत सोनाळीच्या नागनाथ गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली तर द्वितीय क्रमांक राजमाता महिला संघ बोळावी, तृतीय क्रमांक नंदिनी गौरी गणपती ग्रुप व्हन्नु, चौथ्या क्रमांकाचा मान श्री महालक्ष्मी ग्रुप व्हन्नाळी यांनी तर पाचवा क्रमांक हिंदुस्तान महिला संघ शिंदेवाडी यांनी पटकावला.

विशेष म्हणजे या स्पर्धेस उपस्थित असलेल्या पाच महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने पैठणी साडी भेट देण्यात आली. पाच हजार हून अधिक महिलांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती लावली होती. या स्पर्धा शाहु हॉल कागल येथे पार पडल्या. स्पर्धेचे बक्षीस वितरण शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचे  उत्तम दर्शन घडवले. ग्रामीण भागातील महिलांचे सादरीकरण तर थक्क करणारे होते. आपल्या  संस्कृतीचा हा अनमोल ठेवा अखंड जपण्यासाठी  जिजाऊ समिती आणि राजे फौंडेशन सदैव अग्रेसर राहील. महिला पुढे येण्यासाठी तयार आहेत पण त्यांना कोणीही व्यासपीठ निर्माण करून देत नाही. यापुढे महिलांसाठी हे व्यासपीठ आम्ही देऊ असे नवोदिता घाटगे म्हणाल्या, या स्पर्धेचे चॅनलच्या  माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केल्यामुळे भारतासह इतर देशातील नागरिकांनीही या स्पर्धा ऑनलाईन पाहिल्या.