पुणे (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज मंगळवारी (दि.21) बारावीचा निकाल जाहीर केला. दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता बारावीचा परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली. यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेच्या प्रमाणात 2.12 टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक निकाल कोकणचा 97.51 टक्के एवढा आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबईचा 91.95 टक्के आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

यंदाही मुलींची बाजी

याहीवर्षी बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचं निकालावरून स्पष्ट होतंय. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 91.60 टक्के आहे. तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 95.44 टक्के एवढे आहे.

14 लाख, 33,071 विद्यार्थ्यांनी केली होती नोंदणी –

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेतली होती. बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील 14 लाख, 33071 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

असा आहे विभागवार निकाल –

 पुणे  -94.44 टक्के

नागपूर  -92.12 टक्के
छत्रपती संभाजीनगर- 94.08 टक्के
मुंबई -91.95 टक्के
कोल्हापूर -94.24 टक्के
अमरावती -93 टक्के
नाशिक -94.71 टक्के
लातूर- 92.36 टक्के
कोकण -97.51 टक्के
एकूण -93.37 टक्के

 ‘या’ वेबसाईटवर पाहा निकाल

mahahsscboard.in
mahresult.nic.in
results.digilocker.gov.in

बारावीचा निकाल कसा पहाल?

  1. वरील वेबसाइटवर जा. तुमच्या फोनच्या इंटरनेट ब्राउझरवर वर नमूद केलेल्या URL पैकी कोणतीही एक टाइप करा.
  2. बारावी परीक्षेच्या निकालाची लिंक शोधा : इयत्ता १२ वी अथवा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा २०२४ निकालाची लिंक या वेबसाइट्सच्या होम पेजवर दिसेल. ती लिंक ओपन करा.
  3. लॉग इन करा : तुम्हाला तुमचा बोर्ड परीक्षा रोल नंबर प्रविष्ट करायला हवा. यासोबतच तुमच्या आईचे नावदेखील नमूद करा. अर्जात आईचे नाव नमूद केले नसल्यास त्याऐवजी ‘XXX’ वापरा.
  4. तपशील सबमिट करा : एकदा पूर्ण झाल्यावर तपशील सबमिट करा आणि पेज लोड होण्याची प्रतीक्षा करा.
  5. तुमचा निकाल तपासा आणि प्रिंटआउट घ्या : तुमचा बारावीचा निकाल पुढील पेजवर दिसेल. तुमचे गुण तपासा, पेज डाउनलोड करा अथवा भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.