कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्यासाठी टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारण्यासाठी अनुदान देण्यात येते. यासाठी इच्छूकांनी आपले अर्ज mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले.
रोपवाटिकेसाठी १० गुंठे क्षेत्रावरील शेडनेटगृह उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत-जास्त रक्कम १ लाख ९० हजार रूपये, प्लॅस्टीक टनेलकरिता येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत-जास्त रक्कम ३० हजार रूपये तसेच पॉवर नॅकसॅक स्प्रेअर करिता येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत-जास्त रक्कम ३ हजार ८०० रूपये व प्लास्टिक क्रेटस करिता येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत-जास्त रक्कम ६ हजार २०० रूपये असे एकूण २ लाख ३० हजार पर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:च्या मालकीची किमान ०.४० हे (7/12 वरील नोंदीनुसार) जमीन व पाण्याची कायमची सोय असलेले शेतकरी पात्र आहेत. यामध्ये महिला कृषी पदवीधर यांना प्रथम, महिला गट, महिला शेतकरी यांना व्दितीय तसेच भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, शेतकरी गट यांना तृतीय याप्रमाणे प्राधान्यक्रम राहील. उद्दिष्टांपेक्षा जादाचे अर्ज प्राप्त झाल्यास सोडत काढून योजनेची अंमलबजावणी मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येईल. योजनेच्या मार्गदर्शक सूचना http://www.krishi.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत.