श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर भागात सुरु असणाऱ्या दहशतवादी हालचाली काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. आज (सोमवारी) काही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ११० बटालियनवर बेछूट गोळीबार केला. जम्मू काश्मीर पोलिसांच्या साथीने ही जवानांची तुकडी पुलवामा जिल्ह्यातील पंपोरच्या कंदीझल पूलापाशी रोड ओपनिंग ड्युटीसाठी तैनात होती.
माहितीनुसार दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात २ जवान शहीद झाले आहेत. तर, ३ जवान जखमी झाले आहे. जखमींवर नजीकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दहशतवाद्यांकडून हा हल्ला झाल्यानंतर जखमी जवानांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, या हल्ल्यानंतर महामार्गावर लगेचच वाहन प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवाय घटनास्थळ आणि त्यानजीकच्या परिसरात संरक्षण दलांनी शोधमोहिमही सुरु केली आहे.