कोल्हापूर (प्रतिनिधी) : हार्वेस्टर मशीनने तोडलेल्या उसाची मोळी बांधणी एक टक्का करावी. पूरबाधित क्षेत्रातील ऊस प्राधान्याने तोडावा, या प्रमुख मागण्यांसाठी आज (बुधवार) जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने पेठवडगाव परिसरातील ऊस तोडण्या बंद पाडल्या. यावेळी मोटरसायकल रँलीही काढण्यात आली.

कारखानदार एक टक्का मोळी बांधणीसाठी ‌टाळाटाळ करीत आहेत. यासाठी आज पासून तोडी रोखायचे जय शिवरायने ठरवले होते. त्यानुसार लाटवडे, भेंडवडे, खोची, बुवाचे वाठार, नरंदे, सावर्डे, मिणचे, वठार, तळसंदे, भादोले, किणी, घुणकी या गावातील ऊसतोडी बंद पाडल्या. जोपर्यंत मोळी बांधणीचा विषय मिटत नाही. तोपर्यंत तोडी घ्यायच्या नाहीत, असे शेतकऱ्यांना व ट्रॅक्टर मालकांना आवाहन केले. दरम्यान, या आंदोलनाची तातडीने दखल घेत याबाबत साखर कारखानदारांची व आंदोलक अंकुश आणि जय शिवराय किसान संघटना यांची संयुक्त बैठक प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता बोलवली आहे. या बैठकीत तोडगा निघेल, अशी अपेक्षा असून जर तोडगा निघाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला.

या आंदोलनामध्ये सदाशिव कुलकर्णी, बंडा पाटील, शिवाजी शिंदे, शितल कांबळे, गब्बर पाटील, अशोकराव पाटील, श्रीकांत माने, सुनील पाटील, रामदास वड्ड, भीमराव मोरे, अनिकेत कणेरकर, धनपाल पाटील, बजरंग अवघडे, प्रशांत माने आदीसह जय शिवराय किसान संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.