मुंबई : देशात लोकसभेचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान पा पडले आहे. आता चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोर आला असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर टीका करायची एक संधीही सोडत नाहीत. तर अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत यांनी शाहा यांना टोला लगावला आहे.

अमित शाह यांनी इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, ते पाच वर्षात देशावर पाच पंतप्रधान थोपवू शकतात, असा हल्लाबोल केला होता. त्यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह जर इंडिया आघाडीमध्ये येणार असतील तर आम्ही त्यांना पंतप्रधान करू असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.

जालना येथील सभेत बोलताना अमित शहांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली होती. अमित शहा म्हणाले होते की, एकीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली १२ लाख कोटी रुपयांचा घोटाळा करणारी इंडिया आघाडी आहे. तर दुसरीकडे २३ वर्षांपासून एकही सुट्टी न घेता भारतमातेची सेवा करणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यावर २५ पैशांच्या भ्रष्टाचाराचा आरोप कोणी करू शकत नाही. एनडीएकडे नेता, नीती आणि आगामी २५ वर्षांसाठी देशाच्या विकासाचा अजेंडा आहे. विरोधकांकडे ना नेता आहे, ना नीती आहे, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला होता.

अमित शहांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी खोचक शब्दात पलटवार केला. पत्रकारांनी अमित शहा यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारताच संजय राऊत म्हणाले, आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी नेता नाही, मग काय करायचं? अमित शह येत आहेत का इंडिया आघाडीमध्ये? आम्ही त्यांना पंतप्रधान करतो. तुमचा चेहरा बघा आधी, थकला आहे आता. आजारी पडला आहे. त्यांच्याकडून रोज खोटं बोललं जात आहे. आम्ही आमचं बघू, तुम्ही आमची चिंता करू नका, असा पलटवार राऊत यांनी केला आहे.