कोल्हापूर ( प्रतिनिधी ) चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील यांच्या कोल्हापुरातील तीन घरांवर छापे टाकून झडती घेतली असता या कारवाईत पथकाने पाटील यांच्या घरातून 28 तोळे सोने, एक अलिशान कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील वय 54, मूळ रा. आर. के. नगर, कोल्हापूर यांनी बिअर शॉपीला परवानगी देण्यासाठी कार्यालयातील कर्मचा-यांकरवी तक्रारदाराकडून लाखाची लाच घेतली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारदाराने याबाबत माहिती दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चंद्रपूर पथकाने मंगळवारी दि. 7 रोजी सापळा रचून ही कारवाई केली.

या कारवाईनंतर अधीक्षक पाटील पसार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर पथकाने पाटील यांच्या कोल्हापुरातील तीन घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाईत पथकाने पाटील यांच्या घरातून 28 तोळे सोन्याचे दागिने, एक अलिशान कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वरिष्ठ अधिका-यावर झालेल्या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.