मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारला कोरोना साथीच्या संकटाला चांगल्या पद्धतीने प्रतिकार करता न आल्याची टीका विरोधी पक्षासह विविध स्तरातून होत आहे. यालाच एका अर्थाने आरोग्यमंत्री राजेश टोपे पुष्टी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्या आहेत. सरकारने जीसीसी बायोटेक कंपनीकडून खरेदी केलेल्या १२ लाख ५० हजार किट्स सदोष आढळून आल्याची कबुली मंत्री टोपे यांनी दिलीय.
टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येते. जीसीसी बायोटेक कंपनीच्या माध्यमातून राज्यभरात वितरित झालेल्या किट्समध्ये मोठ्या प्रमाणात लो पॉझिटिव्हिटी रेट आढळला आहे. एनआयव्हीच्या अहवालानुसार, या कंपनीच्या किट्स सदोष आहेत. अशा किट्स पुरवणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केले जाईल. जिथे किट्सचं वाटप झालं आहे तिथले निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे, जेणेकरुन टेस्टिंग थांबू नये. एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील. ही घटना पुन्हा घडू नये याची काळजी घेण्यासाठी ज्या किट्स हाफकिनकडून खरेदी केल्या जातात, त्या खरेदीसंदर्भात एनआयव्हीच्या तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे. टेस्टिंग हा महत्त्वाचा विषय आहे. त्याची सेन्सिटिव्हिटी जर २७ टक्क्यांपर्यंत खाली आली तर चुकीचे निकाल येतील. म्हणून याबाबत पूर्ण सतर्कता आणि दक्षता घेतली जाईल.