मुंबई ( वृत्तसंस्था ) काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने तक्रार दाखल केली होती. यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडिओचा बळी ठरला आहे.

मास्टर ब्लास्टरने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, या व्हिडिओमध्ये डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून तो एका अॅपची जाहिरात करताना दाखवला जात आहे.

‘डीपफेकचा गैरवापर ठीक नाही…

सचिन तेंडुलकरने X वर लिहिले की, हा व्हिडिओ खोटा आहे, तुम्हाला फसवण्यासाठी बनवण्यात आला आहे. त्यांनी पुढे लिहिले की, डीपफेकचा गैरवापर योग्य नाही. आपणा सर्वांना विनंती आहे की, असे व्हिडिओ किंवा अॅप्स किंवा जाहिराती दिसल्यास लवकरात लवकर त्याची तक्रार करावी. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे. संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करावी.

यासोबतच मास्टर ब्लास्टरने इलेक्ट्रॉनिक्स, आयटी मंत्रालय आणि या मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनाही यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर म्हणत आहे की, त्याची मुलगी ऑनलाइन गेम एव्हिएटर खेळते आणि त्यातून ती 180 हजार रुपये कमवत आहे. आता चांगले पैसे मिळवणे किती सोपे झाले आहे. याविरोधात सचिनने आवाज उठवला आहे.