आजरा (प्रतिनिधी) : जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (वय २०) यांना वीरमरण आले आहे. ऋषीकेश हुतात्मा झाल्याचे वृत्त समजताच बहिरेवाडीसह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

दोन वर्षांपूर्वी ६ मराठा बटालियनमध्ये भरती झालेले ऋषीकेश सध्या जम्मू-काश्मीर सीमेवर तैनात होते. पाकिस्तानी सैनिकांनी काही दिवसांपासून सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत. आपले जवानही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. आज पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत ऋषीकेश हुतात्मा झाले.

ऐन दिवाळीच्या तोंडावर अवघ्या २० वर्षांच्या ऋषीकेशला हौतात्म्य प्राप्त झाल्याने बहिरेवाडीसह पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. ऋषीकेशच्या पश्चात आई-वडील, लहान बहीण असा परिवार आहे.