धामोड (प्रतिनिधी) : ‘शिक्षण’ हा मानवी जीवनातील सुरुवातीच्या काळातील महत्त्वाचा टप्पा. याठिकाणी यशस्वी झालेला विद्यार्थी आपल्या वैयक्तिक जीवनात प्रत्येक वळणावर येणाऱ्या संकटातून मार्ग काढण्यासाठी बौद्धिक क्षमतेने परीपूर्ण झालेला असतो. पण हीच पायरी यावर्षी डगमगताना दिसत आहे. यामुळे सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आपले कुटुंब कोरोनाच्या संसर्गापासून कसे दूर राहील या विचारात असणारा पालक यावर्षी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलाकडे पाहून अधिकच चिंताग्रस्त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होवून आता सात महिने पूर्ण झाले. शासनाने मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये,त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, शाळेत न येता मुलापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी ऑनलाइन शिक्षण पध्दत सुरू केली आहे. शिक्षकांनी देखील ही योजना मुलांपर्यंत कशी पोहचेल यासाठी प्रयत्न केला. परंतु साडेसात लाख खेडी असलेल्या या देशातील ग्रामीण भागात ही शिक्षण पध्दत पूर्णपणे अयशस्वी होताना दिसते आहे.

याला अनेक कारणे देखील आहेत. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे उपलब्ध अपूर्ण साधन सामुग्री आणि ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांना ग्रामीण भागात नेटवर्कमध्ये येणारा अडथळा. यामुळे सर्वच विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून दूर जाताना दिसत आहेत. मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असून ती टिव्ही पाहणे आणि गल्ली बोळात खेळताना जास्त दिसत आहेत. या शिक्षणापासून दूर होत चाललेल्या मुलांकडे पाहून शिक्षकांबरोबरच पालक चिंताग्रस्त होताना दिसत आहेत. यावर लवकरच शैक्षणिक विभागाने काहीतरी नवीन मार्ग काढून या दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आल्यास जानेवारी ते डिसेंबर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे अशी मागणी पालकांनी केली आहे.