अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार नसल्याने नाराज

मुंबई : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात एकही अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला नसल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. नसिम खान यांनी शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) स्टार प्रचारकाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची ही नाराजी समोर आली. तसेच अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला न गेल्याने मला वाईट वाटले असून यापुढे काँग्रेसचा प्रचार करणार नाही, असे काँग्रेस नेते नसीम खान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

दरम्यान, शुक्रवारी त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून आपण स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नसीम खान यांनी सांगितले. आज पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार नसीम खान म्हणाले की, या महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुका चालू असताना 48 लोकसभांमध्ये एकही अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे समाजामध्ये पक्षाबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातून विविध अल्पसंख्यांक संघटनेच्या नेत्यांनी, त्या संघटनेच्या प्रमुखांकडून फोनवरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती नसीम खान यांच्याकडून देण्यात आली आहे.

तसेच, काँग्रेस पक्षाने अल्पसंख्यांक समाजाचा एकही उमेदवार न देण्याचे नेमके कारण काय आहे, हे स्पष्ट करावे, असे प्रश्न लोकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मी काँग्रेसचा ज्येष्ठ नेता असल्याने आणि कार्यकारी अध्यक्ष असल्याने याबाबतचा प्रश्न मला विचारण्यात येत आहे. त्यामुळे या प्रश्नांशी मी सुद्धा सहमत असून पक्षाची जी भूमिका आहे, ती या निवडणुकीत का डावलण्यात आली? का कोणताही अल्पसंख्यांक उमेदवार देण्यात आलेला नाही, असा प्रश्न मलाही पडलेला आहे, त्यामुळे मी याबाबतचा ठोस निर्णय घेत स्टार प्रचारकाचा राजीनामा दिला आहे, असे नसीम खान यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मोठ्या संख्येने अल्पसंख्यांक…
यावेळी नसीम खान यांनी अल्पसंख्यांक समाजातील लोकांची माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात असे अनेक लोकसभा मतदारसंघ आहेत, जिथे 30 ते 35 टक्के अल्पसंख्यांक लोक आहेत. मराठवाडा, विदर्भ, मुंबईतील सहा लोकसभांमध्ये 25 ते 30 टक्के मतदार आहेत. पण तरी देखील एकाही लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने एकही उमेदवार का दिला नाही, हा जो प्रश्न निर्माण होत आहे, त्यामुळेच मी सुद्धा स्टार प्रचाराचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असे खान यांनी सांगितले.

इथून पुढे काँग्रेसचा प्रचार नाही…
या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचा प्रचार केला. पण यापुढे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी कोणताही प्रचार करणार. त्यासाठीच मी राजीनामा दिला आहे. जी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे, ती मी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना सांगितली आहे. हा प्रश्न एकट्या नसीम खानचा नाही किंवा अन्य काही नाही. प्रश्न अल्पसंख्यांक समाजाचा आहे. आजवर राजस्थान, कर्नाटक, गोवा, गुजरात व अनेक राज्यात पक्षाचा प्रचार केला, पण आता ते शक्य नाही. काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गाकवाड यांना माझ्या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली असली तरी मी त्यांचा प्रचार करणार नाही, पण माझ्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार करायला सांगेन, असे नसीम खान यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.