पुणे (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने एम.एस.सी.ची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थी टाहो फोडत आहेत. मात्र सरकार परीक्षा पुढे ढकलायला तयार नाही. आताच एम.पी.एस.सी परीक्षा घेणे हे ठाकरे सरकारचे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला.

पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, येत्या ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एम.पी.एस.सी. च्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. मात्र काहीही करून सरकारला ही परीक्षा घ्यायचीच आहे, आणि विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचंय. परंतु आमचा अंत न पाहता सरकारने परीक्षा पुढे ढकलाव्यात नाहीतर आम्ही धरणे आंदोलन करू. लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य सरकार एम.पी.एस.सी. विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. मंत्रालयात बसलेले काही लोकं हे षडयंत्र करत आहेत. सरकारला आमचं सांगणं आहे की विद्यार्थ्यांना विनाकारण रस्त्यावर आणू नका. नाहीतर होणाऱ्या परिणामांना सरकारने तयार रहावे.