कोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. पी. एन. पाटील यांनी आज (मंगळवार) दुपारी अचानक भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ असून अनेक घडामोडींना वेग आला आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कारखान्याचे संचालक मनधरणी करीत आहेत.

सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत आ. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पॅनेलचा पराभव करून या गटाची सलग दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. आ. पाटील यांची चेअरमनपदी निवड झाल्यावर त्यांनी भोगावतीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकरी, ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र आज अचानक आ. पाटील यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली.

राजीनाम्याचे नेमके कारण समजले नसले तरी कार्यबाहुल्यामुळे त्यांना कारखान्याच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होत नसल्याने त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यांच्या या निर्णयामुळे समर्थक, कार्यकर्ते आणि संचालक नाराज झाले असून त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी मनधरणी सुरु आहे.