पाटणा (वृत्तासंस्था) : ‘राजद’ चे सुप्रीम लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यांना लवकरच हवाई रुग्णवाहिकेने दिल्लीस्थित एम्स रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर पाटणास्थित पारस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आसिफ रहमान यांनी दिली.

मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालूंची मुले तेजस्वी-तेज प्रताप पारस हॉस्पिटलमध्ये आहेत.  नितीश कुमार म्हणाले की, लालूजींची प्रकृती आता स्थिर आहे. मी सतत त्याच्या तब्येतीची चौकशी करत होतो. त्यांना सरकारी सुविधांसह दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. हा त्यांचा हक्क आहे.

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी लालूप्रसाद यांच्या हितचिंतकांना आवाहन केले आहे की, पारस रुग्णालयात लालूप्रसाद यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोणीही लोक रुग्णालयात येऊ नये आणि तुम्ही जिथे आहात, तेथूनच प्रार्थना करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार हे लालू प्रसाद यांच्या प्रकृतीची सातत्याने माहिती घेत आहेत. लालू प्रसाद यांचे हितचिंतक सतत त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. लालू प्रसाद यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट केले की, ‘ज्यांनी प्रत्येक अडथळा पार केला, करोडो लोकांचे आशीर्वाद त्यांची ताकद आहे.’

लालू प्रसाद हे राबडी देवी यांचे निवासस्थान असलेल्या १० सर्कुलर रोड येथील त्यांच्या खोलीत जात असताना शिडीवरून पडून त्यांचा उजवा खांदा फ्रॅक्चर झाला होता. कंबरेला दुखापत झाली होती. यानंतर त्यांना तत्काळ उपचार देण्यात आले; परंतु वेदना कमी करणाऱ्या औषधांमुळे त्यांची अस्वस्थता आणखी वाढली.