मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालत आणीबाणी लादण्याऐवजी नागरिकांनी स्वत:वरच काही बंधने घालून घ्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून केले.

पूर्वीच्या काळात फटाके वाजवण्यात गंमत होती. मात्र, अलीकडे लोकसंख्या आणि प्रदूषण वाढले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण होऊन कोरोनाचा धोका वाढत असेल, तर आपण फटाक्यांवर बंदीऐवजी स्वत:वर काही बंधने घालून घेऊ शकत नाही का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

ते म्हणाले, दिवाळीत फटाकेबंदी करून मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचे का, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा. नागरिकांनी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घराच्या आजुबाजूला फटाके जरुर वाजवावेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवू नये.

कोरोनाच्या काळात महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी राज्याची बदनामी करण्याचे कारस्थान केले. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली, असा गैरसमज त्यांच्याकडून पसरवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र द्वेष्टे हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत आहे. या इतक्या बदनामीनंतरही आपल्या महाराष्ट्राने जून महिन्यात नव्या उदयोगधंद्यांशी १७ हजार कोटींचे करार केले. हे करार केवळ कागदावर राहणार नसून प्रत्यक्षात येतील. महाराष्ट्रात नवी गुंतवणूक आणि उद्योगधंदे येत आहेत. त्यामुळे रोजगार निर्माण होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

तुम्ही मुंबईकरांच्या विकासात मिठाचा खडा टाकताय याची जाणीव आहे का, असा टोला भाजपला लगावत ते म्हणाले,राज्य सरकारने मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जमिनीची निवड केली. ही जमीन मिठागाराची असून ती केंद्राच्या मालकीची असल्याचा आता अनेकजण सांगत आहेत. मात्र, कांजूरमार्गची जमीन मिठागाराची आहे, हे सांगणाऱ्यांना आपण मुंबईकरांच्या विकासाच्या मार्गात मिठाचा खडा टाकतोय, याची जाणीव नाही का ? लोकल ट्रेन सूचनेनुसार हळूहळू सुरू होत आहेत. याबाबतीत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आपल्याला चांगल्याप्रकारे सहकार्य करतील.