नाशिक : राज्यात गेल्या महिनाभरापासून लक्ष लागलेल्या नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला असून नाशिकची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होता, त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही या जागेवर दावा केला होता. मात्र, काही केल्या उमेदवाराची घोषणा होत नसल्याने छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या जागेवरील आपला दावा सोडत असल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे, बुधवारी भाजपा नेते गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड 1 तास चर्चा झाली. त्यानंतर, नाशिक लोकसभेसाठी आज महायुतीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. अखेर विद्यमान खासदार शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच मोठा ट्विस्ट आला होता. छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील असे बोलले जात असताना सोमवारी शांतीगिरी महाराजांनी नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेना शिंदे गटाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिकच्या उमेदवारीचा तिढा सोडवत हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत झालेल्या खलबतानंतर अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असून हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचा आग्रह डावलून नाशिक स्वतःकडे खेचण्यात मुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे, आता नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत रंगणार आहे. आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या राजाभाऊंनी प्रचाराचारी एक फेरी पूर्ण केली आहे. त्यामुळे, आता हेमंत गोडसे यांना पायाला भिंगरी लावून पुढील 18 ते 19 दिवस प्रचाराच्या मैदानात उतरावे लागणार आहे. तसेच, पुढील 18 दिवस मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी त्यांची मोठी धावपळ होणार आहे.