कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : दूध उत्पादकांना आणि संघाच्या प्रशिक्षण केंद्राकडे येणाऱ्या प्रशिक्षणाथींना आयुर्वेदिक गुणकारी असलेल्या वनस्पतींची माहिती होण्यासाठी हर्बल गार्डनची निर्मिती केली आहे. याचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) आणि जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ताराबाई पार्क येथे जनावरांच्या रोग निदान प्रयोगशाळेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

विश्वास पाटील म्हणाले की, या हर्बल गार्डनमध्ये कोरफड, आडूळसा, शतावरी, हळद, तुळस, गुळवेल, हाडजोड, शेवगा,कडीपत्ता, कडुनिंब, लिंबू,लाजाळू आदी वनस्पतींचे प्रात्यक्षिक प्लॉट केला आहे. या वनस्पतींचा वापर प्रामुख्याने जनावरांच्या मस्टायसिस आणि ताप,डायरिया,अपचन,विषबाधा, लाळ खुरकत आदी आजार बरे करण्यासाठी केला जातो. याची माहिती सर्व दूध उत्पादकांना संघाच्या परिपत्रकाद्वारे कळवली आहे याचा उपचाराचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

तसेच गोकुळ आपल्या कार्यक्षेत्रातील जनावरासाठी पशुवैद्यकीय सेवा अत्यंत प्रभावीपणे राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून जनावरांना झालेल्या रोगाचे अचूक निदान ताडतडीने होण्यासाठी रक्त,मलमूत्र याची तपासणी होणे गरजचे असते. त्यामुळे वेळेत उपचार करता येतात. या सर्व जनावरांच्या तपसणीसाठी संघाकडून नाममात्र शुल्क आकारण्यात येत असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले.

यावेळी व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. यु. व्ही. मोगले, सहा. व्यवस्थापक डॉ. प्रकाश दळवी, डॉ. पी. जे. साळोखे, डॉ. अश्विनी टारे, डॉ. मगरे, डॉ. गोरे तसेच पशुसंवर्धन विभागाकडील डॉक्टर,अधिकारी, कर्मचारी उ‍पस्थित होते.