कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक वेळा लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य जनता असे घटक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना वीजबिल आणि घरफाळा यामध्ये सूट द्यावी, अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली.

महाडिक यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारंवार करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनता आर्थिक समस्यांना तोंड देत आहे. लॉकडाउन काळात शिरोळच्या शेतकऱ्यांना त्यांनी कष्टाने पिकविलेला भाजीपाला अक्षरशः फेकून द्यावा लागल्याचे वृत्त आपण पाहिले असेलच. व्यापारी लोकांचेही व्यावहारिक गणित कोलमडले आहे. जिल्ह्यातील हे घटक अडचणीत सापडले आहेत. तरीही त्यांच्याकडून सक्तीने वीजबिल व घरफाळा सारखे कर वसुल केले जात आहेत. दैनंदिन खर्च भागवणे अवघड होत असताना हे लोक हा खर्च कसा करणार, हा प्रश्न आहे. अशावेळी सरकार म्हणून आपण त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यासारख्या घटकांना वीज बिल व घरफाळा यामध्ये सूट द्यावी, अशी मागणी केली आहे.