मास्को (वृत्तसंस्था) : शीतयुद्ध संपुष्टात आणणारे माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून मिखाईल गोर्बाचेव्ह हे आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

गोर्बाचेव्ह हे १९८५ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले होते. तसेच १९९१ पर्यंत ते या पक्षाचे सरचिटणीस होते. त्यानंतर सोविएत संघाचे पतन झाले. त्यांनी ग्लासनोस्टचे धोरण म्हणजेच सरकारला सल्ला आणि माहितीच्या विस्तृत प्रसाराचे धोरण स्वीकारले होते. मिखाईल गोर्बाचेव्ह हे युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिकचे अर्थात यूएसएसआरचे शेवटचे नेते होते. त्यांना नेहमी लोकशाही तत्त्वांच्या आधारावर नागरिकांना स्वातंत्र्य देऊन कम्युनिस्ट राजवटीत सुधारणा करायची होती. सरकारी यंत्रणेवरील पक्षाचे नियंत्रण कमी करण्यासाठी त्यांनी अनेक सुधारणा केल्या.

सोव्हिएत युनियनचे अध्यक्षपद सोडल्यानंतर गोर्बाचेव्ह यांना जगभरातील अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९९० मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आँटोन गट्रेस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे की, मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मी दुःखी आहे. त्यांनी शीत युद्ध संपवण्यात जे साहस दाखवले ते प्रशंसनीय आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रोन यांनी मिखाईल यांना ‘मॅन ऑफ पीस’ संबोधले आहे. ते म्हणाले, मिखाईल यांनी युरोपात शांततेसाठी त्यांच्या कटिबद्धतेने आमचा इतिहास बदलला. संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, गोर्बाचेव्ह एक असे राजकीय नेते होते, ज्यांनी इतिहास बदलला. शीत युद्ध शांततापूर्ण रितीने संपवण्यासाठी त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे.