नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (JNUSU) ने रविवारी तब्बल तीन दशकांनंतर पहिल्यांदा एका दलित व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. संयुक्त डाव्या पॅनेलने रविवारी जेएनयूएसयू निवडणुकीत सर्व पदांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (एबीव्हीपी) पराभव केला. चार वर्षांच्या कालावधीनंतर झालेल्या निवडणुकीत, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) चे धनंजय यांनी 2,598 मते मिळवून JNUSU अध्यक्षपदी विजय मिळवला, तर ABVP चे उमेश सी अजमीरा यांना 1,676 मते मिळाली.


धनंजय हे गया, बिहारचे रहिवासी आहेत आणि बत्तीलाल बैरवा यांच्यानंतर डाव्यांकडून या विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे पहिले दलित अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. 1996-97 मध्ये बैरवा यांची विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. विजयानंतर धनंजय म्हणाले की, हा विजय जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा जनमत आहे की, ते द्वेष आणि हिंसेचे राजकारण नाकारतात. त्यांच्या हक्कांसाठी आम्ही लढत राहू आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करत राहू. ते म्हणाले की, कॅम्पसमधील महिलांची सुरक्षा, निधीत कपात, शिष्यवृत्ती वाढ, पायाभूत सुविधा आणि पाण्याचे संकट या पहिल्यापासूनच विद्यार्थी संघटनेच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमात आहेत.

विजेत्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या समर्थकांनी ‘लाल सलाम’ आणि ‘जय भीम’च्या घोषणा देत स्वागत केले. उमेदवारांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी लाल, पांढरे आणि निळे झेंडेही फडकवले. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे अविजित घोष यांनी ABVP च्या दीपिका शर्मा यांचा 927 मतांनी पराभव करून उपाध्यक्षपदी विजय मिळवला. घोष यांना 2,409 तर शर्मा यांना 1,482 मते मिळाली.

डाव्या बाजूच्या बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन (बाप्सा) च्या उमेदवार प्रियांशी आर्य यांनी सरचिटणीसपदी विजय मिळवला, त्यांनी एबीव्हीपीच्या अर्जुन आनंद यांचा 926 मतांनी पराभव केला. आर्य यांना 2,887 मते मिळाली तर आनंद यांना 1961 मतांवर समाधान मानावे लागले. शुक्रवारी झालेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ७३ टक्के मतदान झाले, जे गेल्या १२ वर्षांतील सर्वाधिक आहे.