मुंबई  (प्रतिनिधी) : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणाच्या चौकशीसाठी अर्णब यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. सध्या अर्णब यांना अलिबागमध्ये नेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

दरम्यान, मुंबई पोलिसांनी जबरदस्ती धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतल्याचे काही फोटो रिपब्लिक वाहिनीवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानंतर #ArnabGoswami हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी सासू-सासरे, मुलगा, आणि पत्नी यांना देखील मारहाण केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. रिपब्लिक वाहिनीवर सध्या हे व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात येत आहेत. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.