कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) मागील ५ वर्षांपासून ६१३ वाहनांचे मूल्य अल्प दाखवून संगनमताने १ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा कर शासनाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून त्याचा अहवाल आठवड्याभरात राज्याच्या परिवहन आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी आज (बुधवार) दिली.

डॉ. स्टीव्हन अल्वारीस म्हणाले की, वाहनांची खरेदी एकाच महिन्यात होत नाही. त्यामुळे वाहनांच्या खरेदीत तफावत असू शकते. याशिवाय वाहनांच्या रंगात बदल झाल्यास त्या वाहनांचे मूल्य कमी-जास्त होऊ शकते. साधारणपणे वाहनांच्या मूल्यावर १० ते १६ टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो. हे कार्यालय ३ जिल्ह्यांसाठी असले तरी ठपका असलेल्या ६१३ वाहनांची खरेदी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनीच केली आहे आणि ही सर्वच वाहने ४ चाकी आहेत. कर चुकविण्यासाठी वाहनांच्या किमती कमी दर्शवल्या गेल्या आहेत,  असे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) या रकमेचा कर शासनाकडे जमा केला नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. वाहन विक्रेते अथवा कर्मचारी यात दोषी असतील,  तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.