कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआरमधील ‘ट्रॉमा केअर’ सेंटरमध्ये आग लागल्यामुळे व्हेंटिलेटर जोडेपर्यंत तीन रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला. या गंभीर घटनेबाबत आज (मंगळवार) भाजपा शिष्टमंडळाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ‘संपूर्ण जिल्ह्यातील गोर-गरीब जनतेचा हक्काचा दवाखाना म्हणजे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय होय. सध्या कोल्हापूर जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कोल्हापूरमध्ये रोज शेकडो संक्रमितांची नोंद होत आहे. रुग्ण संख्येच्या मानाने वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यात मृत्यूदर ३टक्केहून अधिक झाला आहे. त्यातच काल सीपीआरमधील ‘ट्रॉमा केअर’ सेंटरमध्ये आग लागली. त्यामुळे व्हेंटिलेटर जोडेपर्यंत तीन रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही अतिशय गंभीर बाब आहे.’
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी फोनद्वारे जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. ट्रॉमा केअर सेंटर पूर्वरत होण्यासाठी प्रशासनाने त्वरित प्रयत्न करावे, असे सुचवले. त्याचबरोबर या ट्रॉमा केअर सेंटरसाठी भाजपा म्हणून काही सहभाग लागल्यास त्यामध्ये देखील सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सुचवले.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, ‘गोर-गरीब रुग्णांना सीपीआर शिवाय अन्य ठिकाणी अन्यत्र उपचार घेणे, आर्थिक बाबीमुळे शक्य होत नाही. तरी सीपीआरमधील ‘ट्रॉमा केअर’ सेंटर २४ तासात पुन्हा पूर्ववत बनवावे. सीपीआर व शासनाच्या सर्व रुग्णालयांचे इलेक्ट्रिकल ऑडिट व्हावे, जेणेकरून अशा घटना पुन्हा पुन्हा घडणार नाहीत. कालच्या या आगीच्या घटनेमुळे रुग्णांचे स्थलांतर करून व्हेंटिलेटर जोडेपर्यंत झालेल्या विलंबामुळे ज्या तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांना केली.
प. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘वारंवार फायर ऑडिट होणे गरजेचे असल्याने अग्नीशामन दलाने सूचित केले. तरी देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्टाता यांनी दुर्लक्ष केलेले दिसून येते. या बाबीची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या घटनेची चौकशी होऊन उच्च स्तरीय समितीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे संगितले.
यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, कोमनपा विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, भाजपा गटनेते अजित ठाणेकर उपस्थित होते.