पयन्नूर (वृत्तसंस्था) :  केरळमध्ये आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. केरळमधील कन्नूरच्या पयन्नूरमधील ही घटना आहे. हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याची माहिती आहे. हा हल्ला आज (मंगळवारी) सकाळी घडवून आणण्यात आला.

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पयन्नूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. स्थानिक पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असतानाही हा हल्ला झाला. बॉम्ब हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कन्नूरसारख्या संवेदनशील जिल्ह्यात कार्यालयांना विशेष संरक्षण द्यायचे आहे. ते केले जात नाही. हा केवळ निष्काळजीपणा आहे. हे सांगताना मला खेद वाटतो आणि राज्यातील कोणत्याही राजकीय कार्यालयाचे नुकसान झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा भाजपचे टॉम वडाक्कन यांनी दिला आहे.