राशिवडे ( प्रतिनिधी ) भोगावती सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक झाली. यामध्ये कारखाना वाचवायचा असेल तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही तयार आहोत. असा सूर सर्व पक्षांनी व्यक्त केला. मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याने तो सोडविण्यासाठी नेत्यांचा कस लागणार आहे.


भोगावतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ सभासद बी. के. डोंगळे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी बी.के. डोंगळे यांनी स्वागत करून कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत मत व्यक्त केले. यानंतर झालेल्या चर्चेमध्ये कारखाना आर्थिक अडचणीत आहे हे सर्वांना मान्य आहे.

मात्र बिनविरोध करीत असताना केवळ कारखाना वाचवणे हे ध्येय डोळ्यासमोर नवीन संचालकांनी जाणीव ठेवायला हवी आहे. कारखाना उर्जीतावस्थेत आणण्यासाठी काय मुद्दे आहेत आणि सर्वच पक्षांकडून एकत्रितपणे काय धोरण ठरते यावर चर्चा व्हावी . केवळ सत्तेची इच्छा व्यक्त करून प्रत्येकाने आपला सविता सुभा मांडण्यास सुरवात केल्याचं म्हटलं.


दरम्यान गोकुळचे माजी संचालक आणि भोगावतीचे माजी उपाध्यक्ष पी. डी. धुंदरे यांनी मागील सत्तेचा फॉर्मुला लक्षात घेऊन मोठ्या पक्षांना मोठा वाटा आणि त्यांनी आपले इतर मित्रपक्ष सामावून घ्यावे असे मत व्यक्त केले. स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील आणि शिवसेनेचे अजित पाटील यांनी असे न होता निव्वळ भोगावती कारखाना वाचवणे हा दृष्टिकोन ठेवून सर्वांनाच विश्वासात घ्यावे. तिथे लहान मोठे पक्ष याचा विचार होऊ नये हा मुद्दा मांडला. अभिषेक डोंगळे यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देत असताना कारखाना वाचवण्यासाठी आर्थिक अभ्यास असणारे उच्चशिक्षित लोकांना संचालक मंडळात समावेश करावेत असे सांगितले.


याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील ‘ धैर्यशिल पाटील’ गोकुळचे संचालक किसन चौगले’ केरबा भाऊ पाटील’ हंबीरराव पाटील नामदेवराव पाटील, स्वाभिमानीचे अध्यक्ष जालिंदर पाटील ‘ वसंतराव पाटील ‘ अरुण जाधव ‘ अजीत पाटील ‘ निवास पाटील ‘भरत आमते ‘ दयानंद कांबळे ‘ बाळासाहेब वाशीकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला. या बैठकीला बबन पाटील ‘ मोहन धुंदरे ‘ चंद्रकांत पाटील ‘ शिवाजीराव पाटील ‘ संग्राम पाटील आदी उपस्थित होते . आभार बी.के. डोंगळे यांनी मानले.


एकीकडे बिनविरोधची चर्चा अनंत दुसरीकडे निवडणूक पुर्ण ताकदीनीशी लढविण्यासाठी भोगावती कारखाना कार्यक्षेत्रात संपर्क दौरे सुरु आहेत. त्यामुळे भोगावतीचे सभासद व इच्छुक उमेदवार संभ्रम अवस्थेत असल्याची चर्चा सुरु आहे. भोगावती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी कारखान्याच्या इतिहासात प्रथमच उच्चांकी 488 इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे बिनविरोध करण्यासाठी किती जण माघार घेतात यावरुन स्पष्ट होणार आहे.